रत्नागिरी : खरेतर दिवाळी पहाटेला शहरी संस्कृतीत गाण्यांच्या मैफिली आयोजित केल्या जातात, मात्र सडये गावातील शालेय मुले, तरुणांनी जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सड्यावर पदयात्रा काढून प्राचीन कातळशिल्प, रखरखीत कातळावरिल बाराही महिने पाणी देणारे पाणवटे, आडवाटांवरिल दुर्गम देवतांचा शोध घेतला. यावेळी कातळशिल्पांचे संवर्धन व्हावे, या हेतूने त्यांना संरक्षण व रेखाचित्रणही करण्यात आले.

सोमवार दि.२४ रोजी सकाळी सडये गावातील मुले, तरुणांची ही पदयात्रा पार पडली. गावातील जेष्ठ नागरिक दत्ताराम खवळे आणि अनंत धुमक यांनी या पदयात्रेच्या आडवाटांचे मार्गदर्शन केले. सुरुवातीला माचाण या ठिकाणी भेट देण्यात आली. त्यानंतर सोमेश्वर देवस्थानच्या वृक्षराजीने नटलेल्या, घनदाट देवराईला भेट देऊन देवराईचे महत्व मुलांना सांगण्यात आले.

गुराख्यांचे अर्थात जांगल्यांचे देवस्थान असलेल्या जांगलदेव याठिकाणी भेट देण्यात आली.पुर्वीच्या काळी गुरे चरत असताना मनोरंजनासाठी गावागावातल्या जांगलदेवस्थानासमोर भजनं रंगत असत. त्यातून नवनवीन काव्ये, गाणी यांची निर्मिती होत असे. असे हे जांगलदेव साहित्यिक निर्मितीचे केंद्रस्थान होते. कातळ म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष्य. असे असताना गुराख्यांना, गुरांना बारा महिने पाणी पुरविणार्‍या पाण्याच्या दगडी टाक्यांना यावेळी भेट देण्यात आली. रखरखित उन्हातल्या या टाक्यांमध्ये आजही बारा महिने थंडगार पाणी टिकून असते, या नैसर्गिक स्त्रोतांचे महत्व नव्या पिढीला समजावून सांगण्यात आले.

कातळशिल्प हा कोकणच्या संस्कृतीचा अनमोल ठेवा. सडये-पिरंदवणेच्या सड्यावरिल कातळशिल्प शोधण्याचा यावेळी मुलांनी प्रयत्न केला. यावेळी 'भेकर' हा प्राणी आणि 'माणूस' ही दोन कातळशिल्पे सड्यावरील कातळात आढळून आली. मुलांनी त्यावरिल माती, रान काढून साफ केली व त्यांच्या रेखांना रंगकाम करुन ती सुस्पष्ठ केली. तसेच त्यांचे संवर्धन व्हावे, याकरिता त्यांना दगडी संरक्षण केले.

त्यानंतर कोकणातील प्रमुख मातृदेवता श्री भराडीण क्षेत्राला भेट देण्यात आली. याठिकाणच्या कातळावर असलेल्या ३५ फुट लांब असलेल्या आडालाही भेट देण्यात आली. याही आडात बाराही महिने पाणी असते. भराडणीच्या देवस्थानात पुजा, आरती, भजन असा कार्यक्रम पार पडला. दत्ताराम खवळे यांसह लहान मुलांनी यावेळी अभंग गायन केले.

भराडणीची घाटी उतरुन टोळवाड परिसरातील पेशववकालीन उजव्या सोंडेचे माेरेश्वर देवस्थान तसेच भावे आडम गावचे देवस्थान श्री सप्तेश्वर या देवस्थानाला भेट देण्यात आली. याचठिकाणी क्षेत्रदेवता म्हणून अत्यंत आडजागेत वसलेल्या जाखमाता या देवस्थानाला भेट देण्यात आली.

यानंतर या यात्रेची सांगता करण्यात आली. अनंत धुमक, मारुती धुमक, अमोल पालये यांनी या पदयात्रेचे यशस्वी आयोजन केले होते. या पदयात्रेत हितेश नार्वेकर, सुरज माने, गुरुनाथ धुमक, रोशनी पालये यांसह शालेय विद्यार्थी, तरुणवर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता.