रत्नागिरी : सांगली शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेस पोलिसांनी जेरबंद केले. अनघा अनंत जोशी (वय ६१, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) असे संशयित महिलेचे नाव असून, तिच्याकडून सहा लाख ३१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपयांची रोकड, असा सहा लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मध्यवर्ती बसस्थानकावरून प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले होते. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी खास पथक तयार करून याचा तपास सुरू केला होता. बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक सुशिक्षित वयस्कर महिला गर्दीचा फायदा घेऊन चोरी करून निघून जात असल्याचे दिसून आले होते.

यानंतर पोलिसांनी तपास आणखी वाढवत जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर, शाहूवाडी, शिरोळ, मलकापूर, साखरपा व रत्नागिरी येथील बसस्थानकातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यात संशयित अनघा जोशी ही सांगलीत चोरी करून याच मार्गावरून रत्नागिरीला जात असल्याचे दिसून आले. ते चार ते पाच महिन्यांपासून पोलीस या महिलेची माहिती घेत होते. त्यानुसार पोलिसांनी सांगली बसस्थानकावर चोरी करणारी जोशी हीच महिला असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर तिने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून सहा लाख ३१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये जप्त करण्यात आले. सांगली शहर पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.