दापोली : दापोली नगरपंचायत मधील आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन रोखपाल दीपक सावंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध सुरु असतानाच तो शुक्रवारी पोलिसांना शरण आला. त्याला शनिवारी दापोली न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दापोली नगरपंचायतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन रोखपाल दीपक सावंत याच्यावर दापोली पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्यावर ५ कोटी ८१ लाख शासकीय निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा गन्हा दाखल झाल्यानंतर आठवडाभरात दीपक सावंत खेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात येऊन दाखल झाला. त्याला पोलिसांनी अटक करून शनिवारी दापोली न्यायालयात हजर केले. पोलिसांनी न्यायालयात त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. ही मागणी ग्राह्य धरून न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पोलीस कोठडीत असल्यावर दीपक सावंतची कसून चौकशी करण्यात येणार आहे. पोलीस जबाबात तो कोणाची नावे सांगतो, याकडे लक्ष आहे. दीपक सावंत पोलिसांना शरण आल्यामुळे दापोलीतील अनेकांचे पितळ उघडे पडणार असून, त्यांचे धाबे दणाणले आहेत.