पुणे जिल्ह्याच्या खेड, शिरूरसह पुणे महानगरपालिकेला वरदान ठरलेल्या भामा आसखेड ( ता. खेड) धरणात सध्या ८२.४३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात ४१.९६ टक्के पाणीसाठा होता.
म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी धरणात जवळपास दुप्पट पाणीसाठा आहे. तर मागील सात दिवसांत धरणात जवळपास ४० टक्के म्हणजे तीन टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.
भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून ५५३ मीमी पावसाची नोंद झाली आहे.धरण क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाने जवळपास दडीच मारली होती.परंतु मान्सूनच्या आगमनानंतर पावसाची संततधार सुरू असून पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. (दि.१८) सकाळी सहा वाजलेपासून दुपारी १ वाजेपर्यंत ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा ६.७९ टीएमसी म्हणजे ८२.४३ टक्के असून उपयुक्त पाणीसाठा हा ६.३२ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ४१.९६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता म्हणजेच यावर्षी हा साठा ४० टक्केने अधिक आहे.
धरणातील पाणीसाठा ९० ते ९५ टक्केच्या पुढे गेल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून धरणातून पाणी सोडले जाईल अशी माहिती भामा आसखेड धरण प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी तुळशीराम आंधळे,शाखा अभियंता निलेश घारे-देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील काळात नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.