खेड: मनसेचे राज्य सरचिटणीस आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. लॉटरी प्रकरणात ते गोत्यात आले असतानाच, आता मागासवर्गीयांचा निधी स्वार्थासाठी वापरल्याचा ठपका ठेवत सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे खेडेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
या प्रकरणी समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी वैभव खेडेकर यांच्याविरोधात खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मनसे नेते वैभव खेडेकर यांना विनापरवानगी लकी ड्रॉप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र, शनिवारी (२२ ऑक्टोबर) दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. दि. ८ फेब्रुवारी, २०२२च्या शासन निर्णयात खेड नगरपरिषदचे तत्कालीन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मौजे भडगाव भरणे बाईतवाडी बौद्धवाडी येथे २०१५-१६ विशेष घटक साकव बांधणी योजनेंतर्गत साकव मंजूर केला होता. मात्र, हा साकव एका खासगी इमारतीत जाण्यासाठी पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल केल्याचे म्हटले आहे. प्रशासकीय मान्यतेच्या अटी व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश समाजकल्याण आयुक्त यांनी दिले आहेत. या अहवालाच्या आधारे दि. ९ मे, २०१२ रोजी राज्य शासनाचे कक्ष अधिकारी प्रशांत वाघ यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून वैभव खेडेकर यांच्यावर विनाविलंब कारवाई करावी, अशी सूचना केली होती. त्यानसार. हा गन्हा दाखल झाला आहे.
• बिल्डरला झाला लाभ
या साकवाचा मागासवर्गीय वस्तीला लाभ होत नाही. एका खासगी इमारतीत ये-जा करण्यासाठी बिल्डरला त्याचा उपयोग व्हावा, हा हेतू साकव बांधण्याचा असल्याचे स्पष्ट दिसून येते, अशी निरीक्षण समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे दिली आहेत.