शिरुर: महाराष्ट्राला संतांची खुप मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक प्रवचन तसेच किर्तनकार समाजप्रबोधन करत आहेत. त्यासाठी ते योग्य मानधनही घेतात. कधीकधी मानधन कमी मिळाल्याने काही किर्तनकार नाराज झाल्याच्याही घटना आपल्या आसपास आपण पहात असतो. परंतु शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे ज्या व्यक्तीचा दशक्रिया विधी आहे. त्यांना अपत्य नसल्याचे कळताच शिवव्याख्याते ह.भ.प. गणेश महाराज फरताळे यांनी 'मी ही त्यांच्या मुलाप्रमाणेच आहे असं समजा असं म्हणतं' प्रवचनाच मानधन त्या कुटुंबाला परत करत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
कारेगाव येथे शामराव मल्हारी शितोळे यांचं दहा दिवसांपुर्वी निधन झालं होत. त्यांच्या दशक्रिया विधिला शिवव्याख्याते ह.भ.प. गणेश महाराज फरताळे यांचं प्रवचन होत. प्रवचन झाल्यानंतर शामराव शितोळे यांना अपत्य नसल्याचे फरताळे महाराजांच्या लक्षात आले. त्यावेळेस ऐन दिवाळीत शितोळे यांच्या पत्नीला झालेलं दुःख पाहून फरताळे महाराजांनी प्रवचनाच 'मानधन' नाकारत ते मानधन शितोळे यांच्या पुतण्याकडे परत दिलं. विशेष म्हणजे कारेगावच्या ग्रामस्थांनी यावेळी चहा पिण्याचा आग्रह केला. त्यालाही फरताळे महाराजांनी नम्रपणे नकार दिला. यावेळी दशक्रिया विधीसाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांसह कारेगाव ग्रामस्थांनीही या गोष्टीचे कौतुक केले.