रत्नागिरी : पीक पाहणी नोंदणीसाठी आता शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे. तिसऱ्यांदा मुदतवाढ देताना आता २२ ऑक्टोबरपर्यंत अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

महसूल विभागाकडून शेतकरी स्तरावरील पीक पाहणीची नोंदणी करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ करून १५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांनी पीक पाहणी करावी, असे आवाहन करण्यात आले होते.

परंतु, असे असताना अजूनही काही शेतकरी हे पीक पाहणी करण्यापासून वंचित आहेत आणि त्यांनी अजूनही पीक पाहणी केलेली नाही. अशाच शेतकऱ्यांसाठी एक शेवटची संधी म्हणून पीक पाहणी करण्याकरिता २२ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदतीत ऑनलाईन नोंदी न झाल्यास शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजनेतून आर्थिक मदतीला मुकावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पाहणी ॲपचा वापर करून नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.