दिवाळीसाठी चिमुकल्यांनी बनवले इको फ्रेंडली आकाशकंदील
आकाश भोरडे
तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:
कोरेगाव भीमा(ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी इको फ्रेंडली आकाशकंदील बनवण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती.
गेले दोन वर्षे कोरोनामुळे मुलांना दिवाळी साजरी करता आली नाही. यावर्षी सर्व सण उत्साहामध्ये साजरे होत असल्याने दिवाळीसाठी स्वनिर्मितीतून बनविलेला आकाशकंदील आपल्या घरावर लावता यावा म्हणून इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कलाशिक्षिका वैशाली गावडे व अर्चना गर्जे यांनी मुलांना आकाशकंदील बनवण्याचे मार्गदर्शन केले.दिवाळीनिमित्त आकाशकंदील बनवणे व पणती रंगवणे असे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे उपक्रम शाळेत राबविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आनंद झाल्याचे पहायला मिळाले.तसेच यावेळी इको फ्रेंडली आकाशकंदील घरावर लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा मुलांनी संकल्प केला.
सदर कार्यशाळेसाठी मुख्याध्यापिका कुसुम बांदल, वनिता कालप, शैलजा टाकळकर, सुरेश सातपुते, इंदुमती शेळके, तुकाराम सातकर, सरोज सातकर, चंद्रकला कुसाळे, रूपाली बावकर, जयमाला मिडगुले, शितल डिके, गणेश दाते शिक्षक उपस्थित होते.