बीड- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कोणताही संबंध राहिलेला नाही. शिवसेना संकटात असताना जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेकडे पाठ फिरवली. तीन वर्षाच्या कालावधीत पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला उत्साहात सहभाग नोंदवला नाही. अलिकडच्या काळात पक्षश्रेष्ठींनी संपर्क साधूनही क्षीरसागरांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिवसेना आपल्या विचाराने आणि आपल्या ताकदीने बीड जिल्ह्यात वाटचाल करेल असे पत्रकार परिषदेत संपर्कप्रमुख धोंडूदादा पाटील आणि जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी स्पष्ट केले.
बीड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक पार पडल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना संपर्कप्रमुख धोंडूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख अनिल जगताप पत्रकारांशी संवाद साधताना असे म्हणाले, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि शिवसेना यात आता कोणतेही स्नेहसंबंध राहिले नाही. गेल्या काही दिवसांपासून पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर या संपर्काला कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. पक्षश्रेष्ठीच्या आदेशानेच आज आम्ही भूमिका विषद करत आहोत. क्षीरसागरांची राष्ट्रवादीमध्ये दमछाक होत असताना शिवसेनेने त्यांना पक्षात सन्मान दिला. निष्ठावंतांना बाजूला ठेऊन पक्षप्रवेशावेळेस त्यांना मंत्रिपद देवू केले. केवळ मंत्रीपद दिले नाही तर बीड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देवून शिवसैनिकांना जीवाचे रान करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले होते. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी गत विधानसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली होती. जीवाचे रान करत त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. त्यांचा अल्पशा मताने पराभव झाला. त्यांचा पराभव का झाला हे सर्वश्रूत आहे. गत अडीच वर्षात पक्षाने नेहमीच त्यांना संघटनेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला. जेथे जेथे त्यांना अडचण आली. शिवसेना कवच म्हणून त्यांच्यासोबत उभी राहिली. आत्ताच त्यांनी ज्या ७० कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ केला. तो निधीही स्वत: पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने देण्यात आला. मात्र काळाच्या ओघात शिवसेना अडचणीत असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनाच्या पाठिशी खंबीर उभे राहण्याऐवजी पक्षातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. अडीच वर्षाच्या काळात वारंवार निमंत्रण देवून निरोप देवूनही पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमाला पक्षाच्या अभियानाला ते उपस्थित राहिले नाहीत. वरिष्ठ नेत्यांच्या कार्यक्रमातही ते गैरहजर राहिले. त्यांची एकंदरीत राजकीय भूमिकामध्ये विसंगती आढळून येत आहे. ते आज काही स्पष्ट बोलत नसले तरी त्यांची राजकीय भूमिका मात्र वेगळी असल्याचे निदर्शनात येत आहे. या त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी शासंकता निर्माण झाली आहे. गाफील राहून शिवसेना आपले नुकसान करू इच्छित नाही.त्यासाठी शिवसेनेने ठाम भूमिका घेत पक्षाचा आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही शिवसैनिक पक्षाच्या भूमिकेचा आदर करून त्यांच्या आदेशाचे पालन करू असे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी म्हटले.
यावेळी संपर्कप्रमुख धोंडूदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप , आप्पासाहेब जाधव यांच्यासह शिवसेना लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे,शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे,माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे,न.प.माजी सभापती सुनिल अनभुले,युवासेना जिल्हा युवा अधिकारी सागर बहिर,किसानसेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते,शिव सहकार सेना जिल्हा संघटक पंकज कुटे,शिवसेना माजी तालुका प्रमुख उल्हास गिराम,जिल्हा संघटक नितीन धांडे,जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे,शिवसेना उप जिल्हाप्रमुख हनुमान जगताप,आशिष मस्के,सुशील पिंगळे,शिवसेना तालुका प्रमुख गोरख सिंघण,मा.जि.प.सदस्य किशोर जगताप,शिवसेना शहर प्रमुख सुनिल सुरवसे,माजी पं.स.सदस्य दिपक काळे,नवनाथ शिंदे,सदाशिव सुर्वे,राजेंद्र पाटील,शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.