औरंगाबाद:- दि.२२ ऑक्टो.(दीपक परेराव) - अस्मानी संकटाबरोबरच सुलतानी संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. मात्र सरकार बदल्या करण्यात व्यस्त असून शेतकऱ्यांच्या प्रश्नी दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल करीत आज औरंगाबादेत पत्रकार परिषदेत आरोप केले.

 अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरेसा हैराण झाला असून सरकारची मदतीची घोषणा निव्वळ फोल ठरली आहे. यावरुन सरकार शेतकऱ्यांप्रति असंवेदनशीलता दिसून येत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.

कृषीमंत्री गुडघाभर पाण्यात फिरूनही शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करत नाहीत असे म्हणत कृषी मंत्र्यांनी केलेल्या विधानाचा दानवे यांनी समाचार घेतला. सरकारने ३४०० कोटी रुपये मदतीची घोषणा केली, मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाही. महाराष्ट्रात पावसाने थैमान घालून अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे.

जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली असून उभी पिकं पाण्यात तरंगत सडली आहेत. यामुळे नवीन पिकं घेणे शक्य होणार नसल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी मागणी दानवे यांनी केली. 

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले असून मुख्यमंत्र्यांची आत्महत्या मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना फेल झालेली आहे.मेळघाटात आत्महत्या केलेल्या युवक शेतकऱ्याच्या घरी भाजीला तेल नसल्याची भावना कुटुंबांनी व्यक्त केली, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारने दिलेल्या दिवाळी शिधा कीटवर आपला फोटो लावण्यासाठी चार दिवस घातले ते कशासाठी, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

दिवाळीला दिलेल्या कीट अपूर्णच असून १०० रुपयांच्या किटला सरकारने ३०० रुपये प्रमाणे टेंडर काढलेले आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाकडे मंत्र्यांनी चक्क पाठ फिरवले आहे. स्वतःची खळगी भरण्यासाठी विमा कंपन्या काम करीत आहेत. अतिवृष्टि झाल्यास ७२ तासात पंचनामे करुन १० दिवसांत कंपनीने सर्वे करुन मदत केली पाहिजेत हे नियम बाजूला ठेवून त्यांचा टोल फ्री नंबर बंद असतो. प्रशिक्षणार्थी माणसे चांगले नसतात, या विमा कंपनीला सरकार पोसत असल्याचा गंभीर आरोपही दानवे यांनी केला.