औरंगाबाद : कोविड-19 च्या प्रार्दुभावानंतर दोन वर्षाने निर्बंधमूक्त दिवाळी आपण साजरी करीत आहोत, गोरगरिब नागरिकांसाठी आनंदाने व गोड पदार्थाने साजरी व्हावी यासाठी शासनाने “आनंदाचा शिधा” किटचे वाटप राज्यभर केले आहे. आनंदाच्या शिधा या उपक्रमातुन सर्वसामान्यांची दिवाळी आनंदाची व्हावी अशा शुभेच्छा किट वाटप कार्यक्रमात पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शिधापत्रिका धारकांना दिल्या.
या कार्यक्रमास आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल्डा कॉर्नर परिसरातील स्वस्त दुकानावर आनंदाची शिधा किटचे वाटप करण्यात आले. या किट मध्ये 1 किलो चनादाळ, 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 लि. पामतेल याचा समावेश होता.दिवाळी निमित्त जिल्ह्यात जवळपास साडेसहा लाख रेशन धारकांना आनंदाचा शिधा किट वाटप 100 रुपयामध्ये करण्यात येत आहे. रेशनकार्ड धारकांना सुस्थितीत नसलेल्या रेशनकार्डाची दुय्यम प्रत आवश्यक ठिकाणी देण्या बाबतच्या निर्देश पालकमंत्री भुमरे यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वस्त धान्य दुकानाची पाहणी केली. दुकानात उपलब्ध असणारा धान्यसाठा, दर नोंदवही, शिधावाटप नोंदवही तपासून स्वस्त धान्य दुकानदाराला वेळेवर आणि दर्जेदार धान्याचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले. तसेच काही शिधा पत्रिका अद्यायावत करण्याच्या सूचना दिल्या. उपस्थित लाभार्थी सुनंदा नवगिरे यांच्याशी संवाद साधून रेशन वाटप वेळेवर मिळते का यासंबधी जाणून घेतले, तसेच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. प्रातनिधीक स्वरूपात काशीनाथ गंगावणे, राजेंद्र नवगिरे, किसनराव तांबुस, कैलास निकाळजे, लक्ष्मण वाहुळ, रेखा कोरडे, अपर्णा यादव आणि पाडुंरंग जाधव यांना आनंदाच्या शिधा किटचे वाटप करण्यात आले.