चिपळूण: शहरातील वाहतूकदारांसाठी पर्यायी रस्ता म्हणून ओळखला जाणारा मुरादपूर व पेठमाप रस्ता अर्थात जुन्या कोयना रस्त्यावर पूल उभारण्याचे नियोजन नगर परिषदेने केले आहे. अशातच हा पूल आतापासूनच वादात सापडला आहे. याप्रश्नी दोन माजी उपनगराध्यक्ष आमने-सामने आल्याने नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांनी, मुरादपूर या फाट्यावर वाशिष्ठी नदीचा नाईक कंपनीकडे जाणारा प्रवाह बंद करण्यासाठी काढलेला गाळ टाकून पाणी अडवले आहे. या ठिकाणी नगर परिषद बांधत असलेला ११ कोटींचा नवीन पूल बांधण्याची गरज लागणार नाही. या पुलावर होणारा खर्च स्वागत हॉटेलसमोरून खेड कोलेखाजनकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिव नदीवर पूल बांधल्यास शहरातील ३० टक्के वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. त्यामुळे हा पूल निधी असूनही इतर मटण मार्केट, भाजी मंडई इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या प्रकल्पांप्रमाणे वादात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शहरात पेठमाप येथून मुरादपूर महाराष्ट्र हायस्कूलकडे जाणारा जुना कोयना रस्ता आहे. कोळकेवाडी धरणातील विद्युत निर्मितीनंतर सोडले जाणारे पाणी खूप वेगाने येत असल्याने शिव नदीतून येणाऱ्या पाण्याला अडवते, परिणामी शहरात पाणी भरते. समुद्रातील पणी आणि जगबुडीचे पाणी हे सगळे मुद्दे थोड्या प्रमाणात महापुराला कारणीभूत असले, तरी चिपळूण शहराची दिशाभूल करणारे आहेत. कोळकेवाडी धरणातील विद्युत निर्मितीनंतर सोडले जाणारे पाणी खूप वेगाने येत असल्याने हे पाणी जर या फाट्यावर नदीतीलच काढलेला गाळ टाकून अडवले, तर शहरात येणारा महापूर येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.