रत्नागिरी : पगार बिलातील अपहार प्रकरणी वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्लर्कवर निलंबनाची कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने केली आहे. या घटनेने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी तातडीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित क्लर्क हा कर्मचाऱ्यांच्या पगाराची खोटी बिल सादर करून भ्रष्टाचार करत होता. पगार बिल सादर करताना नियमित रक्कम भरणा करण्यात येत होती मात्र, ऑनलाईन भरताना मात्र रक्कम वाढवून भरली जात होती. मागील काही महिन्यांपासून हा भ्रष्टाचार सुरू असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पगार बिलांची तपासणी करताना ही बाब उघड झाली. यानंतर या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली. चौकशीत भ्रष्टाचार झाल्याची बाब निष्पन्न झाली आणि शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला. निलंबन करताना अन्य कुठल्या कर्मचाऱ्याचा सहभाग आहे का? याची खातरजमा केली जाणार आहे. सखोल चौकशी करून अन्य कोणी दोषी आढलल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.