* आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदनआ
गरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत साठ किलोमीटर अंतरावर दूरवरून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना दिवसभर ताटकळत राहून रिक्त हस्ते जावे लागल्याने घोरनिराशेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभाराचा प्रत्यय आला ! याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ .विकासीनी चव्हाण यांनी याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मुरुड तालुक्यातील दूरवर साठ किलोमीटर असलेल्या आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी तीन रुग्णांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आणले होते.परंतु याठिकाणी दिवसभर या रुग्णांना ताटकळत ठेवून शेवटी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया न करताच पाठवून देण्यात आले.त्यामुळे रुग्ण तसेच सोबत असलेले नातेवाईक, वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला आहे.
याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जातीने लक्ष घालून चौकशी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.विकासीनी चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.