धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गात सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या औट्रम घाटात ( ता . कन्नड ) बोगदा करावा या मागणीसाठी उद्धवसेनेचे नेते , माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गेल्या दहा वर्षांत २२१ निवेदने दिली . पण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी याच घाटाच्या प्रश्नावर रास्ता रोको करताना खैरेंना टाळले . त्यामुळे ते दानवेंवर भडकले . माझा जाणीवपूर्वक अपमान होत आहे , असा आरोप त्यांनी केला . घाटात बोगद्याची मागणी २०११ पासून खैरे यांनी लावून धरली . पण आश्वासनांपलीकडे काहीही झाले नाही . त्यामुळे दानवे यांनी हा प्रश्न हाती घेण्याचे ठरवले आहे . या संदर्भात खैरे म्हणाले की , दानवे आता मोठे राजकारणी झाले आहेत . आंदोलन केले हे चांगले झाले , पण मला विचारले असते तर मीही आलो असतो . माझ्यासारख्या नेत्याला ते ठरवून बाजूला करत आहेत . ही संघटनेसाठी चांगली बाब नाही . खैरे राज्याचे नेते म्हणून कदाचित बोलावले नसेल : दानवे अंबादास दानवे म्हणाले की , स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मला बोलावले म्हणून मी गेलो होतो . खैरेंना टाळण्याशी माझा काहीही संबंध नाही . खैरे राज्याचे नेते आहेत आंदोलन जिल्ह्याचे असल्यामुळे कदाचित त्यांना बोलावले नसावे