रत्नागिरी : वडापच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अडीच लाखांचा ऐवज लांबविण्याची घटना घडली आहे    

वडापच्या गाडीतून प्रवास करताना ड्रायव्हर आणि पाठीमागे बसलेले दोन संशयित अशा तिघांनी संगनमताने प्रवाशांच्या बॅगमधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 2 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते 7.45 वा.सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन ते पावस एसटी स्टँड या प्रवासादरम्यान घडली आहे.

याबाबत सुरेश दत्ताराम रसाळ (65,मुळ रा.निरुळ तेलीवाडी, रत्नागिरी,सध्या रा.भाईंदर, मुंबई) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, सुरेश रसाळ हे काही कामानिमित्त आपल्या निरुळ या गावी जाण्यासाठी मंगळवारी सकाळी रल्वेने रत्नागिरीत आले होते. रत्नागिरी रेल्वेस्टेशनबाहेर ते एका वडापच्या टाटा सफारी (क्र.6681) मध्ये पावस एसटी स्टँडला जाण्यासाठी बसले. या प्रवासादरम्यान टाटा सफारीचा चालक आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या अन्य दोन संशयितांनी संगनमताने रसाळ यांच्या बॅगमधून सोन्याचे दागिने चोरले. यामध्ये एक सोन्याचा हार, कानातील कुड्या, अंगठी, कानातील रिंग, सोन्याचा काईन आणि रोख रक्कम 50 हजार रुपये असा एकूण 2 लाख 66 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.