रत्नागिरी : जिल्ह्यात होणारी ओव्हरलोड वाहतूक बंद करून निवळी फाटा येथे आपले स्कॉड उभे करून ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी करावी. यामुळे अनेक गाडी मालकांना न्याय मिळेल व रस्तेही चांगले राहतील. यासंदर्भात स्वाभिमान मालट्रक वाहतूकदार असोसिएशन, कोल्हापूर व एकता मालवाहतूक ट्रकधारक असोसिएशन, सांगली यांच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. यामुळे अनेक मोटारमालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कारण सहा टायर गाडीची माल वाहण्याची क्षमता १२ टन आहे. ती गाडी सध्या २० टन माल वाहतूक करत आहे. १० टायर गाडीची क्षमता २० टन आहे, तरी ती गाडी ३० ते ३५ टन वाहतूक करते व १२ टन टायर गाडीची क्षमता २५ टन असून, ती गाडी ३५ टन मालवाहतूक करत आहे. १४ टायर गाडीची क्षमता ३० टन असून ती गाडी ४० टन मालवाहतूक करत आहे. उदाहरण म्हणजे सांगली ते जयगड फोर्ट याठिकाणी होणारी साखर वाहतूक व मोलॅसेस टँकर व अन्य वाहतूक ओव्हरलोड होत आहे.

जर ओव्हरलोड १०० गाड्या फिरत असतील तर त्याच्यामुळे ३० ते ३५ गाडी मालकांना माल मिळत नाही. ओव्हरलोडमुळे रस्तेही लवकर खराब होतात, हेही आपल्या लक्षात येणे गरजेचे आहे. तरी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात होणारी ओव्हरलोड वाहतूक बंद करून निवळी फाटा येथे आपले स्कॉड उभे करून ओव्हरलोड वाहतूक करणाया सर्व गाड्यांची तपासणी करावी. यामुळे अनेक गाडी मालकांना न्याय मिळेल व रस्तेही शाबूत राहतील. तसेच उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर यांचे आदेशाचे पालन केले पाहिजे. 

याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आम्ही स्थानिक भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड येथील मोटारमालक सहभागी होणार आहोत असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

एकता मालवाहतूक ट्रकधारक असोसिएशन, सांगलीचे अध्यक्ष शंकरराव चिचंकर, उपाध्यक्ष मच्छिंद्र यादव, सचिव सुधाकर खरात तर स्वाभिमान मालट्रक वाहतूकदार असोसिएशन, कोल्हापूर अध्यक्ष युवराज माने, उपाध्यक्ष अभय गारे, सचिव युवराज पाटील यांनी निवेदन दिले.