संगमेश्वर : तालुक्यातील मौजे रांगव, धनगरवाडी येथील धोंडू तुकाराम जांगली यांच्या मालकीच्या सर्व्हे नंबर 104 गवळवाडी मधील गोठ्यामध्ये दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली असल्याची माहिती जितेंद्र चव्हाण यांनी त्यांच्या भ्रमणध्वनी वरून तौफिक मुल्ला, वनपाल संगमेश्वर देवरूख यांना माहिती दिली. त्यानुसार तौफिक मुल्ला यांनी वनपाल संगमेश्वर देवरूख तसेच अधिनस्त कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सदर ठिकाणी बिबट्या या वन्यप्राण्याची 2 पिल्ले आढळून आली. त्यापैकी 1 नर जातीचे पिल्लू अर्धवट खाल्लेले मृत अवस्थेत दिसून आले आहे. सदर मृत बिबट्याचे पिल्लाची सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सक विभाग, देवरूख यांच्याकडून शवविच्छेदन करून घेतले. तसेच 1 पिल्लू सुस्थितीत मिळाले आहे.

चांगल्या स्थितीत असलेल्या बिबट्याचे पिल्लास मादी घेऊन जाईल, या उद्देशाने त्याला नैसर्गिक अधिवासात ट्रॅप कॅमेरे लावून त्याच्यावर निगराणी ठेवली आहे. सदरचे ट्रॅप कॅमेरे लावणेकामी निलेश बापट, मानद वन्यजीव रक्षक, रत्नागिरी जिल्हा तसेच प्रतिक मोरे, वन्यजीव अभ्यासक, देवरूख व त्यांचे टिमने मदत केली आहे. दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) व सचिन निलख, सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे. यापुढे वन्यप्राणी मनुष्य वस्तीत आलेस किंवा संकटात सापडलेस, त्यासंबंधी वन विभागाचे 1926 या हेल्प लाईनवर तसेच वनविभाग मोबाईल क्रमांक 9421741335 वर संपर्क साधणेचे आवाहन वनविभागामार्फत प्रकाश सुतार, परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.