रत्नागिरी : शासनाच्या मोफत एसटी प्रवास योजनेचा जिल्ह्यातील ज्येष्ठांनी चागलाच फायदा घेतला आकडेवरीवरून स्पष्ट होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने ७५ वर्षे पूर्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीतून मोफत प्रवासाची योजना जाहिरी केली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात रत्नागिरी विभागातील १ लाख १३ हजार १८४ ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. ४८ लाख ३४ हजार १२ रुपयांचा ज्येष्ठांनी मोफत प्रवास केला आहे.

राज्य परिवहन महामंडळाकडून समाजातील विविध घटकासाठी प्रवासी सवलत देण्यात येते. ६५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतील प्रवासासाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येत होती. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ वर्षे पुर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली. १ सप्टेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी सर्वत्र एकाचवेळी सुरू करण्यात आली. मात्र या योजनेची विरोधकांनी खिल्ली उडवली होती. या वयात कोण ज्येष्ठ नागरिक एसटीतून प्रवास करणार आहे. परंतु फक्त सप्टेंबर महिन्याचा आकडा थक्क करणार आहे. रत्नागिरी विभागातून जिल्ह्यातील १ लाख १३ हजार १८४ ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. आयुष्याच्या सांजवेळी शासनाने प्रवासात शंभर टक्के सवलत दिली आहे. औषधोपचार तसेच कोर्टकचेरीच्या कामासाठीच घराबाहेर पडतो. शासनाच्या सवलतीचा यात आम्हाला चांगला लाभ होतो, असे काही ज्येष्ठांचे म्हणणे आहे.