रत्नागिरी : एकमेका साह्य करू अवघे होऊ श्रीमंत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, कुणबी समाजोन्नती संघ संलग्न कुणबी समाज राजकीय समितीने आयोजित केलेली आणि मागील २५ दिवस कोकण , पुणे व मुंबई परिसरातील कुणबी व्यावसायिक बांधवांची उत्सुकता वाढवणारी बहुचर्चित कुणबी व्यावसायिक परिषद रविवार दिनांक १६ ऑक्टोंबर ,२०२२ रोजी मुंबईत उत्कर्ष मंदिर मलाड पुर्व येथे , कोकणातील बहुचर्चित विध्वंसक नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणातून हद्दपार करून निसर्ग व कोकणचे संरक्षण करणारे आणि कुणबी समाज राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष कुणबी शिरोमणी श्री . अशोक वालम यांच्याअध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात संपन्न झाली. 

यावेळी प्रमुख मान्यवर माजी कुलगुरू प्रो.डाॅ.अरूण सावंत , प्रांजल पाॅलिमर्स प्रा.लीमीटेडचे सीईओ श्री. धनंजय रहाटवळ, वास्तूयोग ग्रहनिर्मान प्रा.लीमीटेड चे मालक श्री. पाडूरंग शिवगण, सोन्या चांदीचे व्यापारी श्री. महेंद्र टिंगरे, सीए श्रीमती . हर्षांली धाडवे , अनेक प्रोडक्शन कंपन्यांचे मालक व इव्हेंट मॅनेजमेंट करणारे मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. 

या परिषदेची प्रस्तावना समाजातील नामवंत सिने व नाट्य कलाकार श्री . मधुकर सोलकर याने आपल्या मधुर वाणीने करून सर्वानाच आकर्षित केले. सदरच्या व्यावसायिक परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन समाजातील विविध क्षेत्रात अग्रेसर असणारे नामवंत डॉक्टर , वकील , बिल्डर्स , ज्वेलर्स , हिरे व्यापारी , विमा तज्ञ , नॅशनल पदक विजेते व्यावसायिक , संगणक तज्ञ , ऑन लाईन मार्केटिंग तज्ञ आणि महिलांना मासिक पाळीत चुकीच्या सॅनिटरी वापरून होणाऱ्या कॅन्सर सारख्या रोगाला प्रतिबंध करणारे १००% बायो डीग्रेडबल सॅनिटरी नॅपकीन निर्माण करणारे श्री शिवगण व श्रीमती .दीक्षित मॅडम तसेच इतर अनेक लहान मोठा व्यवसाय करणाऱ्या समाज बांधवांनी सहभाग घेऊन अमूल्य असे मार्गदर्शन केले .

मागील वर्षी संपूर्ण जगात COVID 19 , कोरोना विषाणूने हाहाकार माजविला जवळ जवळ १८ महिने भारत बंदच्या परिस्थितीत कोंकण , मुंबईतील अनेक कुणबी व्यावसायिक बांधवांचे व्यवसाय कायमचे बंद झाले . काहींचे संसार उद्ध्वस्त झाले . अनेक बांधव मुंबई , पुणे शहर सोडून पुन्हा आपल्या गावी गेले .कोकणातील अनेकांचे व्यवसाय पुराच्या नैसर्गिक आपत्ती मुळे उध्वस्त झाले त्यातील अनेक व्यावसायिक कर्जबाजारी झाले तर काहींचे संसार उद्ध्वस्त झाले जे आजही उभे राहू शकले नाहीत . कुणबी समाज व्यवसायात अग्रेसर आहे परंतु संघटित नाही . आपण जर संघटित असतो तर आज आपल्या अनेक व्यावसायिक बांधवांना पुन्हा व्यवसायात उभे करू शकलो असतो . अनेक दिग्गज समाजात असतांनाही फक्त संघटित नसल्याने या स्पर्धात्मक उद्योगात आपण इतर समाजा सारखे वाढलेले दिसत नाहीत . परंतु या पुढे असे होणार नाही .कुणबी व्यावसायिक संघ या क्षेत्रातही अग्रेसर दिसेल आणि सर्व शक्तीने व्यवसायिक व नवउद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे सन्माननीय अध्यक्ष श्री . अशोक वालम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. त्याच बरोबर कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्षश्री . भूषण बरे यांनी त्याला दुजोरा देऊन समाज संघ नेहमीच खंबीरपणे व्यवसायिक समिती बरोबर उभा असेल असे आश्वासन दिले . 

कुणबी राजकीय संघटन समितीचे श्री कृष्णा कोबनाक (कार्याध्यक्ष) प्रकाश तरळ, नंदकुमार मोहिते (सरचिटणीस) संभाजी काजरेकर (खजिनदार) यांनीही सर्व व्यावसायिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

सकाळी ०९.०० वाजता सुरू झालेल्या व्यावसायिक परिषदेची सांगता संध्याकाळी ०४.०० वाजता नियोजन समितीचे कर्णधार श्री . प्रेमनाथ ठोंबरे यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन करून करण्यात आली.