रत्नागिरी : 'मी आत्महत्या करायला जातोय' अशी चिठठी लिहून कुवारबाव येथील तरुणाने आपले जीवन संपवले. त्याचा मृतदेह कुवारबाव येथील तलावात सापडला.

      

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरानजिकच्या कुवारबाव येथून सोमवारी रात्री बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह तेथीलच तलावात आज बुधवारी सकाळी मिळून आला आपल्या आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. यश उमेश टाकळे ( २३ , कुवारबाव, रत्नागिरी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे काका महेश सुधाकर टाकळे ( ५४ , रा . कुवारबाव , रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली.

त्यानुसार, सोमवार १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१५ वा .च्या सुमारास यश घरातून निघून गेला होता.जाताना त्याने घरात लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपण आत्महत्या करायला जात असल्याचे लिहून ठेवले होते. मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी शहर पोलीस ठाण्यात यश बेपत्ता झाल्याबाबत त्याच्या काकांनी खबर दिल्यावर शहर पोलिसांनी कुवारबाव परिसरात शोध घेतला असता तेथील तलावाजवळ त्यांना यशचा मोबाईल मिळून आला होता. रात्री उशिरापर्यंत तलावात त्याचा शोध घेण्याचे काम सुरु होते. बुधवारी सकाळी यशचा मृतदेह तलावात मिळून आला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एन . बी . जाधव करत आहेत .