परभणी(प्रतिनिधी)शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून तो लोकशिक्षक आहे. शिक्षकाएवढी श्रीमंती जगात कोणाकडेही नाही. म्हणून शिक्षकांनी नियम अटींच्या चाकोरी बाहेर जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्ये रुजविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी केले.
मंगळवारी (दि.१८) जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत श्रीमती खांडेकर सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करत होत्या. विचारपीठावर परभणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, डाएटचे प्रा. डॉ. प्रल्हाद खुणे, जिंतुरचे गटशिक्षणाधिकारी गांजरे हे उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना खांडेकर म्हणाल्या कि, विद्यार्थ्यांमध्ये संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक बदल घडवून आणावेत. त्यांच्यात असलेला एक तरी सुप्त गुण ओळखून कला, क्रीडा, नृत्य, संगीत या कलागुणांना विकसित करून रसरसून जगणारी तसेच योगासने, प्राणायाम, खेळ यांच्या सहाय्याने निरोगी - निकोप नागरिक घडविण्याचे त्यांनी सांगितले. विविधतेचा वैभवशाली वारसा जपत एक सुदृढ पिढी आपण सर्वजण घडवू या. जीवन कौशल्ये हा शिक्षणाचा आत्मा आहे. ही कौशल्ये प्राप्त करण्यासाठी व काळाची आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करावे असे आवाहन परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी सर्व शिक्षकांना केले.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. शास्त्रज्ञांच्या जयंत्या, परमवीर चक्र व ऑलिंपिक विजेते यांचे जन्मदिवस, एस्ट्रॉनॉमी क्लब, चला शिकू या प्रयोगातून विज्ञान, वाइल्ड लाईफ क्लब, भाषा प्रयोगशाळा, अध्ययन स्तर याबाबत संबंधित कक्ष प्रमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण केले. या उपक्रमांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण विषयक जाणीव जागृती, खगोलशास्त्र व विज्ञानाबद्दल आवड निर्माण होत असून त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे मत विठ्ठल भुसारे यांनी व्यक्त केले.
डाएटचे प्रा. डॉ. प्रल्हाद खुणे यांनीही अध्ययनस्तर उंचावण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ.सिद्धार्थ मस्के यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रल्हाद खुणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, सर्व गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद परभणी यांनी परिश्रम घेतले.