गुहागर : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीची जिल्हास्तरीय ऑनलाईन सभा जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा होऊन उत्साहात पार पडली.

सभेच्या सुरुवातीला संघटन मंत्री श्री. आनंद ओक यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष श्री. मांडवकर यानी आजची जिल्हा स्थिती व यापुढे कार्य करताना ग्राहक संघटनेचे काम चांगले झाले पाहिजे हे विषद केले. तसेच इतिवृत्त वाचन व जमाखर्चा बाबत सविस्तर सांगितले. याला सर्वानुमते मंजुरी देणेत आली.

प्रत्येक तालुकावार झालेला आढावा त्या त्या तालुक्यानी सादर केला. चिपळूणचे सचिव श्री. प्रकाश सावर्डेकर यांनी सदस्यता नोंदणी, महिला जागरण अंतर्गत महिला उद्योजिका सन्मान, संगमेश्वरमधून कोकणप्रांत कोषध्यक्ष वेदाताई प्रभुदेसाई यांनी पोष्ट कार्यालया अंतर्गत ग्राहकांसाठी तालुकास्तर मार्गदर्शन शिबीर, पासबुके उपडेट करणे, दैनंदिनी मागणी, तर गुहागर अध्यक्ष श्री. गणेश धनावडे यांनी सदस्यता नोंदणी, बॅंक अकाउंट अपडेट करणे सारख्या उल्लेखनीय कामाचे सादरीकरण केले.

यावेळी कोकण प्रांत अध्यक्ष श्री. चंद्रकांत झगडे यांनी अन्य माहिती व आढाव्यासोबत ग्राहकाचे काम, प्रतिमा वाढवणे, संघटन वाढविण्यावर भर दिला पाहिजे.

भविष्यात गाव तिथे ग्राहक पंचायतीची शाखा असा उपक्रम राबवण्यात आवाहन केले. राष्ट्रीय कार्यकारिणी सहसचिव सौ. नेहाताई जोशी यांनी कामांचा आढावा घेउन यापुढील कामे व नियोजनासंबंधी माहिती व सूचना केल्या. श्री. केशवराव भट यांनी उद्योग क्षेत्रात ग्राहक संघटनेच्या कार्याबाबत मत मांडले. राष्ट्रीय कोषाध्यक्ष सौ. वेदाताई फडके यांनी अंक नोंदणीसह आर्थिक बाबींचा उहापोह केला.

अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष श्री. मांडवकर यांनी माहितीसह जिल्हा सहकार्य व महत्व विषद केले. तसेच तालुक्यातील ग्राहक संघटनेची चळवळ प्रत्येकाच्या घरघरात पोहचली पाहिजे, यासाठी सर्वसामान्य जनतेच्या समस्या निवारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. शेवटी गुहागर तालुकाध्यक्ष श्री. गणेश धनावडे यांनी सर्वांचे आभार मानले.