रत्नागिरी : परतीच्या पावसाने आज सकाळी विजांच्या कडकडाटासह सुरुवात केली. मात्र दुपारच्या सुमारास जोरदार कोसळत असलेल्या या पावसातच डिंगणी - फुणगुस पुलावर वीज कोसळून पुलाच्या संरक्षक कठड्याच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत. मात्र सुदैवाने यामध्ये एक शाळकरी मुलगा आणि तरुण बचावला आहे.

सविस्तर वृत्त असे की, डिंगणी - फुणगुस या पुलावरून एक तरुण आणि शाळकरी मुलगा घरी जात होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजांचा जोरदार कडकडाट झाला आणि विजेचा भला मोठा लोळ पुलाच्या दिशेने झेपावला. दोघांनीही हे पाहिले आणि तेथून पळत सुटले, मात्र तोपर्यंत वीज पुलाच्या कठड्यावर आदळली. यामध्ये पुलाच्या कठड्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. ज्या ठिकाणी वीज कोसळली त्या ठिकाणापासून जवळपास १०० मीटर अंतरावर हे दोघे होते. सुदैवाने मोठ्या अपघातातून हे दोघे बचावले. वैभव सुभाष पांचाळ आणि शाळकरी मुलगा नीरज राऊत अशी यामध्ये बचावलेल्या दोघांची नावे आहेत.