बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यासह जिल्हाभरात परतीच्या पावासाने प्रचंड धुमाकुळ घातलेला असुन शेतीला तलावाचे स्वरूप आलेले आहे. काबाडकष्ट करून उभारलेल्या खरीपाच्या सर्वच्यासर्व पिकांची ऐन सणासुदीच्या तोंडावर माती झालेली असताना मायबाप सरकारने पंचानाम्याचे गुऱ्हाळ बाजुला ठेवून कुठलीही दिरंगाई नकरता दिवाळीपूर्वी सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी आज बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यात सततचा मुसळधार पाऊस सुरू आहे. सोयाबीन, कापुस यासह सर्वच खरिपाची पिके पुर्णपणे वाया गेलेली असुन शासनाने कुठलीही दिरंगाई नकरता बळीराजाला सरसकट हेक्टरी ५००००/- रु. ची मदत तत्काळ देण्यात यावी नसता बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला. या निवेदनावर ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव वाचिष्ट बडे, प्रदेश संघटक अशोक बहिरवाळ, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष हनुमान घोडके, तालुका उपाध्यक्ष शेख कादर बाबामिया, गणेश वटारे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.