रत्नागिरी : ३७ व्या राज्य किशोर-किशोरी खो-खो स्पर्धेत साखळी फेरीत यजमान रत्नागिरीच्या दोन्ही संघांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच पुणे, उस्मानबाद, सांगलीच्या संघांनीही विजयी घौडदौड सुरु ठेवली.रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी सकाळच्या सत्रात काही सामने चुरशीचे झाले. यजमान रत्नागिरीच्या किशोरी गटात बीड संघावर एक डाव २५ गुणांनी (२६-१) सहज मात केली. पहिल्या आक्रमणात रत्नागिरीने २६ खेळाडू बाद केले. तन्वी खानवीलकर व आरती पाष्टेने प्रत्येकी ४ तर मृदुला मोरेने ३ खेळाडू बाद केले. संरक्षणातही स्वरांजली कर्लेकरने (४ मि. १० सें.), आर्या डोर्लेकरने (२ मि. ५० सें.) खेळ करत विजयात मोलाची भूमिका बजावली. सोलापूरने नंदूरबारवर (१४-२) १ डाव १२ गुणांनी मात केली. विजयी संघातर्फे प्राजक्ता बनसोडे ४ मि. व २ खेळाडू बाद केले. अश्‍विनी मांडवे २.३० मि. खेळ करत १ खेळाडू तर कल्याणीने ३ खेळाडू बाद केले. नंदुरबारतर्फे रोहिणी गावितने १ मि. आणि १.३० मि. खेळ केला. सांगलीने परभणीचा (१२-५) १ डाव ७ गुणांनी पराभव केला. त्यात धनश्री तामखेडेने ४.१० मि., समीक्षा शिंदेने २.३० मि. तर कृतिका अहिरने ३ खेळाडू बाद केले. उस्मानाबाद संघाने लातूरचा तर नाशिकने पालघरचा पराभव केला.किशोर गटातील सामन्यांमध्येही रत्नागिरीच्या संघाने नाशिकवर (२१-१३) ८ गुणांनी मात केली. विजयी संघातर्फे आशिष बालदेने २.४० मि. आणि २.५० मि. संरक्षण करत ३ गडी, पार्थ बुदरने १.३० मि. आणि २.५० मि. खेळ केला. अथर्व गराटेने उत्कृष्ट आक्रमण करत पाच गडी बाद केले. अहमदनगर संघाने मुंबई उपनगरचा (११-९) २ गुण आणि ३.२० मिनिटे राखून पराभव केला. विजयी संघातर्फे प्रेम सिंहने २.३० मि. खेळ करत २ गडी, इन्सान पावराने १.५०, १.४० मिनिटे खेळ केला, तर जितेंद्र वळवीने ३ खेळाडू बाद केले.साखळी गटातील चुरशीच्या झालेल्या सामन्यात सांगलीने मुंबईचा (१३-१०) ३ गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे संग्राम डोंबाळेने २.२० मि. संरक्षण करत वेदांत इनामदारने २.२०, १.५० मि. खेळ करत सर्वाधिक ५ गडी टिपले. निहाल पंडित ३.१०, १.२० मि. संरक्षण करत ३ गडी, विघ्नेश कोरेने १.३० मि. संरक्षण करत २ गडी बाद केला, मात्र संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. उर्वरित सामन्यांमध्ये ठाणेने पालघरचा तर सोलापूरने जळगावचा पराभव केला.