रत्नागिरी : नवीन शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र संपत आले तरीही इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारच्या सूचना शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या नाहीत.
सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी लाभार्थ्याचे अर्ज भरण्याकरीता वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेबाबत कोणतेही सूतोवाच शैक्षणिक वर्तुळातून केले जात नाही. यंदा सदरची योजना सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडे अद्यापही मंजुरीचे आदेश आलेले नाहीत. त्यामुळे विद्याथ्र्यांसाठी परीक्षा घेतली जाणार की नाही? याबाबतची संभ्रमावस्था कायम आहे. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत देशपातळीवर घेण्यात येते.
परीक्षेसाठी समन्वयक म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिसर (एनसीईआरटी) काम करते. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवर सदरची स्पर्धा आयोजित केले जाते. राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व प्रकारच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती परीक्षांचे अर्ज भरण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जातात. अर्धा ऑक्टोबर महिना संपला तरीही राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या आयोजनाबाबत शिक्षण विभागाला कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. यंदासाठी सदरची परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे संगण्यात येत असले तरीही सविस्तर आदेश शिक्षण विभागाकडे प्राप्त न झाल्याने संभ्रमावस्था कायम राहिली आहे.