सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या निमित्त साधून उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कार्यरत स्वयंसहाय्यता समूहाने उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ यांना स्थानिक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्रशासनाने १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा परिषदेमध्ये खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शन आयोजित केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहानी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ यांना बाजारपेठ मिळावी. यासाठी दिवाळी सणाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा परिषदेमध्ये खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शन आयोजित केले आहे. १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा परिषदेमध्ये स्वयंसहाय्यता बचत गट समूहाने उत्पादित केलेल्या पदार्थांचे विक्री स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलचे उद्घाटन आज मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर , ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही जी तनपुरे, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, आदींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रजित नायर यांच्यासह अधिकाऱ्यांनी उत्पादित खाद्यपदार्थांची पाहणी केली. तर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी खाद्यपदार्थांची खरेदी करावी असे आवाहन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले. या प्रदर्शनात अनमोल प्रभाग संघ ओरोस, कन्यारत्न स्वयंसहायता समूह ओवळीये, कुलस्वामिनी स्वयंसहायता समूह ओवळीये, हिरकणी महिला प्रभाग संघ मांडखोल- सावंतवाडी, श्री स्वामी समर्थ स्वयंसहाय्यता समूह ओरोस (सावंतवाडा),आदिसह विविध स्वयंसहय्यता समूह सहभागी झाले आहेत.