रत्नागिरी : ग्रामपंचायतीकडून घराला संरक्षक भिंत बांधून मिळावी यासाठी सह हिस्सेदारांची खोटी सही करून 10 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी टेंब्ये येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजन जगन्नाथ नागवेकर (टेंब्ये, भोंडीवलेवाडी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद दीपक आंबुलकर (50, तोणदे, टेंब्ये) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रंजन नागवेकर याला आपल्या घराला संरक्षक भिंत बांधायची होती. त्यासाठी त्याने ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केला होता. सेस फंडातून संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मंजूरही झाला. मात्र भिंत बांधण्यासाठी नागवेकर याने सह हिस्सेदारांची संमतीपत्रे सादर केली होती. यामध्ये दिपक आंबुलकर तसेच मयत चुलते रामचंद्र आंबुलकर यांसह 10 जणांच्या खोट्या सह्या करून फसवणूक केली आहे, अशी तक्रार दिपक आंबुलकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार रंजन नागवेकर याच्यावर भादविकलम 465, 468, 471, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.