रत्नागिरी : तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ममता जोशी यांना १ हजार १६० तर शिंदे गटाच्या सौ. बारगुडे यांना ८९२ मते मिळाली. उद्धव ठाकरेंच्या गटातील जोशी या २६८ मतांनी विजयी झाल्या आहेत. तर रत्नागिरीतील फणसोप ग्रामपंचायतीवर देखील
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या राधिका साळवी विजयी झाल्या. त्यांना १ हजार ४०० मत मिळाली तर शिंदे गटाच्या शेलार यांना १ हजार ३६ मत मिळाली. राधिका साळवी या ३६४ मतांनी विजयी झाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या ११ पैकी १० जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे राहिल्या तर केवळ १ जागा शिंदे गटाकडे राहिली आहे.
दरम्यान गेले चार टर्म उदय सामंत हे रत्नागिरी मतदासंघांचे आमदार आहेत, शिवाय अनेक मंत्रीपदे देखील त्यांनी भूषवली आहे. आमदार उदय सामंत हे सद्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे उद्योगमंत्री देखील आहेत. असे चित्र असताना मतदारसंघांतील ग्रामपंचायत त्यांच्या हातातून निसटणे हा पुढील निवडणूकीसाठी त्यांना मोठा धक्का मानला जात आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे कोटात आनंदउत्सव साजरा करण्यात येत आहे.