रत्नागिरी : शहरातील पांढरा समुद्र येथे पोलिसांनी छापा टाकून 17 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजा विक्री करणार्‍या एका 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे अर्धा किलोचा 70 पिशव्यामध्ये गांजा आढळून आला. 

सविस्तर वृत्त असे की, पांढरा समुद्र येथे गांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. यांनतर पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले, पो. हवालदार प्रसाद घोसाळे, पो. हवालदार अमोल भोसले, पो. हवालदार विलास जाधव, पो. नाईक आशिष भालेकर, पो. नाईक वैभव नार्वेकर, पो. नाईक पंकज बडेलकर, पो.नाईक प्रवीण पाटील यांनी पांढरा समुद्र येथे सापळा रचला. तरुणाकडे गांजा असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अर्धा किलो गांजा 70 पिशव्यांमध्ये आढळून आला. अजय कारेकर (25) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 15 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.