रत्नागिरी : सध्याच्या युगात अभ्यासासोबत खेळात सहभाग घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांने ऑल राऊंडर कसे बनता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही खेळामुळे खेळाडूच्या मानसिकतेचा कस लागतो, त्यातून तो कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करण्यास कणखर बनत असतो. खो-खो सारख्या वेगवान खेळात महाराष्ट्राने भविष्यात सुवर्ण कामगिरी करावी अशा शुभेच्छा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी दिल्या.

रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित 37व्या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, भारतीय खो-खो असोसिएशनचे सहकार्यवाह डॉ. चंदजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे डॉ. गोविंद शर्मा, राज्य असो.चे खजिनदार अरुण देशमुख, रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय साळवी, राज्य असोसिएशनचे प्रशांत इनामदार, तुषार सुर्वे, राजेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, ऑलंपिकसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा असोत की राष्ट्रीय स्पर्धांमध्येही महाराष्ट्रातील खेळाडू चांगली कामगिरी करुन राज्याचे नाव उज्वल करीत आहेत. खो-खोमध्येही अनेक चांगले खेळाडू राज्यात आहेत. या खेळामध्येही महाराष्ट्राची मान नेहमीच उंचावतील असा विश्‍वास व्यक्‍त करताना, किशोर-किशोरी गटातील राष्ट्रीय स्पर्धेसाठीही त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. डॉ. चंद्रजीत जाधव यांनीही जिल्हा संघटनेने अल्पावधीत घेतलेल्या या स्पर्धेचे कौतुक केले. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बाळू साळवी यांनी प्रस्ताविक करताना जिल्ह्यातील खो-खोच्या यशस्वीतेचा आढावा घेतला. अभिजीत गोडबोले यांनी निवेदन केले तर मान्यवरांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.