खेड : शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ३० व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत खेड नगरपरिषदेने प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी फटाक्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसह नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. हरित व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहे. माझी वसुंधरा अभियान ३० व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत फटाके मुक्त, प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त, प्रदूषण मुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी खेड नगरपरिषद पुढे सरसावली आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रभारी मुख्याधिकारी विनोद ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगांवकर व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.