भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा निल सोमय्या याला मुंबई विद्यापीठाने अवघ्या १४ महिन्यात पीएचडी पदवी बहाल केली आहे. नील सोमय्या यांनी ऑगस्ट महिन्यात पीएचडीसाठी प्रबंध सादर केला, त्यानंतर अवघ्या दीड महिन्यात तोंडी परीक्षा घेऊन दुसऱ्याच दिवशी मुंबई विद्यापीठाने पीएचडी पदवी बहाल केली. मुंबई विद्यापीठाचा हा वेग पाहता यामागे कोणाचा दबाव किंवा हस्तक्षेप होता का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मातंग समाजाचे नेते व काँग्रेसचे प्रवक्ते सुरशेचंद्र राजहंस यांनी केली आहे.
नील सोमय्या यांनी पीएचडीसाठी जून २०२१ रोजी नोंदणी केली तर पीएचडी पदवी प्रदान ही १ ऑक्टोबर २०२२ आहे. मुंबई विद्यापीठाने पीएचडीच्या प्रबंधाबाबत इतर कोणत्याही विद्यार्थ्यांबाबत इतकी तत्परता दाखवलेली दिसत नाही. इतर विद्यापीठातही इतक्या वेगाने व तात्काळ पीएचडी दिली जात नाही. तोंडी परिक्षेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी पीएचडीही दिली गेली हे पाहता यात काही तरी काळंबेरं आहे, संशयाला जागा आहे.
विद्यापीठ जरी सर्वकाही नियमानुसारच झाल्याचा दावा करत असले तरी आणि सोमय्या यांनी खुलासा केला असला तरीही पीएचडीसाठी प्रयत्न करणाऱ्या इतर कोणत्याही विद्यार्थ्यासाठी एवढी तत्पर सेवा कोणतेही विद्यापीठ देत नाही. मुंबई विद्यापाठीने दाखवलेली ही ‘विशेष जलदगती पीएचडी सेवा’ राजकीय दबावापोटी दिली का ? याची चौकशी झाली पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांना सहा-सात वर्षानंतरही पीएचडी मिळत नाही पण किरीट सोमय्या यांच्या मुलाला मात्र १४ महिन्यातच पीएचडी मिळते हे आश्चर्यकारकच असल्याचे राजहंस म्हणाले.