रत्नागिरी : जिल्ह्यात विकासकामांकरिता आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, पालकमंत्र्यांच्या नावाने कोणी फिरेल आणि कामाच्या याद्या मागेल. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. अशातून संघर्ष उभा राहिल, असा सूचक इशारा आमदार भास्कर जाधव यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत दिला.

प्रदीर्घ काळानंतर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नवनिर्वाचित पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली. मात्र, या बैठकीवेळी अनेक विषय कळीचा मुद्दा ठरणार होते. मात्र, पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या चतुराईने नियोजन मंडळाच्या सभेत सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन चुकीचे पायंडे पाडले जाणार नाहीत, असा शब्द दिल्याने विकासकामाकरिता आम्ही सर्वांनी सकारात्मक राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या नावाने जो काही प्रकार सुरू आहे, त्याची वस्तूस्थिती मी नियोजन मंडळाच्या बैठकीत मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी मी असे काही करणार नाही. आमदार, खासदार यांच्याच याद्या मंजूर होतील, असा शब्द दिल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.

खेडच्या माजी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा

या नियोजन मंडळाच्या बैठकीत खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार योगेश कदम हे वारंवार करीत होते. नाईलाजास्तव आम्हाला तोंड उघडावे लागले. केवळ वैभव खेडेकर म्हणून गुन्हा दाखल होणार असेल तर ते चुकीचे आहे. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी सांगितले की, आमदार कदम व संबंधित विभागाचे सचिव त्यांच्याशी बैठक झाली आहे. बैठकीत सचिवांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून माझ्यासह खासदार सुनिल तटकरे व इतर सर्वच सदस्य आक्रमक झाले. एखादे काम मंजूर होते. त्यावेळी त्याची पडताळणी ही प्रशासकीय स्तरावरून होते.