खेड: तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील गुणदेफाटा येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबियांची मुले पळवण्यासाठी आलेल्या एका तरूणास कुटुंबियांच्या सतर्कतेने रंगेहाथ पकडण्यात आले. या तरूणास ग्रामस्थांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी शनिवारी सायंकाळी उशिरा छोटूलाल अमरनाथ भारती (रा. उत्तरपदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुणदेफाटा येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका लोहार कुटुंबियाच्या घरात शुकवारी रात्रीच्या सुमारास एक परप्रांतीय तरूण अचानक घुसला. त्याने सर्वप्रथम घरातील विजेचा बल्ब काढून सर्वत्र अंधार केला. मात्र याची चाहूल कुटुंबियास लागताच सर्व खडबडून जागे झाले. कुटुंबियाच्या सतर्कतेने या तरूणास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडे विचारणा केली असता मुले पळवण्यासाठी आल्याची कबुली देत या पोटी एकजण 20 हजार रूपये देणार असून उर्वरित रक्कम खात्यात टाकणार असल्याचे सांगितले.