रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच रहाटाघर बसस्थानक आणि जिल्हा रूग्णालय व तेथील रूग्णांसाठी बनविल्या जाणाऱ्या जेवणाच्या ठिकाणी भेट देऊन पाहाणी केली. यावेळी सर्वच ठिकाणची विदारक स्थिती समोर आली.

रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी काय केले, कोणत्या उपाययोजना केल्या व आताची वस्तूस्थितीची प्रत्यक्ष पाहाणी नामदार उदय सामंत यांनी केल्याने सर्व गोष्टींची पोलखोल झाली.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पूर्णपणे अस्वच्छता असून स्वच्छतागृहांची दयनिय स्थिती आहे तिच स्थिती रस्त्यांची असून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. तसेच दै. प्रहारने 'भिंतीला पाडले भगदाड' या दिलेल्या वृत्ताची दखल घेत त्याची प्रत्यक्ष पहाणी नामदार सामंत यांनी केली. त्यावेळी तहसीलदार शशिकांत जाधव, नगर परिषदेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांना प्रत्यक्ष बोलवून या परिसराची तत्काळ स्वच्छता करा असे आदेश देण्यात आले. जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी जनतेच्या अनेक तक्रारी असणाऱ्या रहाटाघर बसस्थानकाला भेट दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील रहाटाघर बसस्थानकातून अनेक गाड्या ये-जा करीत असताना परंतु याठिकाणी पडलेले खड्डे, तसेच स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि चालक-वाहकांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. यावर विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांना तत्काळ बोलावून ज्यांना ठेके दिलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करा तसेच जिल्हा नियोजन मधून हा संपूर्ण परिसर चांगल्या करण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्र्यांशी चर्चा करून उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर जिल्हा रूग्णालयातील गैरसोयी आणि तक्रारींची प्रत्यक्ष पाहाणी करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात प्रत्यक्षात असणारे कंत्राटी कामगार आणि असणारे कामगार यांची झाडाझडती घेतली २० कर्मचारी नसल्याचे दिसून आले. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना जी कामे दिली आहेत ती होत नाहीत. त्यांचा प्रत्यक्ष पगार १२ ते १५ हजार असताना त्यांनी मात्र ५ ते साडेपाच हजार देवून ठेकेदार अन्याय करीत आहेत. तसेच बनविले जाणारे जेवण निकृष्ट असून ते रुग्णांना दिले जाते यांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संघमित्रा फुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तसेच या ठिकाणी बांधले जात असणारे विश्रांतीगृह याची पाहणी केली गेली. अनेक वर्षे ते पूर्ण होत नाही यावरही रूग्णांनी तक्रारी केल्या होत्या. जिल्हा रूग्णालयातील स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून कर्मचारी व ठेकेदार फक्त काम न करता पैसे घेतात आणि जनतेची फसवूणक करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले यांना देण्यात आले. त्यावेळी मदन ठिंगरेसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शिंदे गटाचे महेश म्हाप, बिपीन बंदरकर, राजन शेट्ये, सिद्धेश मराठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.