रत्नागिरी : महाराष्ट्रात अाज ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. राज्यातील विविध 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे.एकूण 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी या निवडणूक होणार आहे. यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता आजची ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे.
महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं एकत्रित महाविकास आघाडीचं सरकार होतं. पण राज्यात आजच्या घडीला शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचं एकत्रित सरकार आहे. राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनाचा ग्रामपंचायत निवडणुकीत खरंच परिणाम होतो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.