रत्नागिरी : येथील जिल्हास्तरावरील खेलो इंडिया बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रातील २६ खेळाडूंना किटचे वाटप करण्यात आले. 

खेलो इंडिया ही देशातील एक महत्त्वाची योजना आहे. विविध राज्यांतील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची पात्रता बाळगून आहेत. येत्या २०२८ च्या ऑलिंपिकमध्ये भारताला पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने देशात खेलो इंडिया योजना सुरू झाली आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया केंद्रे स्थापन झाली आहेत. प्रत्येक केंद्रात एका क्रीडा प्रकाराचे परिपूर्ण प्रशिक्षण देण्याची योजना आहे. त्यानुसार रत्नागिरीच्या केंद्रात बॅडमिंटनचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

केंद्रात निवड झालेल्या २६ खेळाडूंना अत्यंत उत्तम दर्जाची रॅकेट, गणवेश आणि सर्व साहित्य देण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, राज्य खो-खो संघटनेचे सचिव संदीप तावडे, प्रशिक्षण केंद्र देखरेख आणि सनियंत्रण समितीच्या सदस्य सरोज सावंत, प्रशिक्षक सुधीर कुमार यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी योजनेची माहिती दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी विशाल बोडके यांनी केले.