चिपळूण : खडपोली गावातील काही लोकांनी चिपळूण तहसील कार्यालयात रेशन दुकान संदर्भात लेखी तक्रार दाखल केली होती. त्या पार्श्वभूमीवर खडपोली रेशन दुकान बंद करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना आता सात किलो मीटरची पायपीट करून गाणे गावी रेशन आणण्यासाठी जावे लागणार आहे.

दरम्यान, त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे याला जबाबदार कोण असा सवाल माजी सरपंच राजाराम कदम यांनी प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केला आहे. या पत्रकात म्हटले आहे की, मागील ३-४ महिन्यांपुर्वी खडपोली गावातील काही मोजक्याच लोकांनी चिपळूण तहसिलदार कार्यालयात रेशन दुकान संदर्भात लेखी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रार अर्जामध्ये काही नियमित धान्य नेणारे, काही एपीएल, तर काही शुभ्र कार्डधारक आहेत. त्यांच्या तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी तहसील कार्यालयातून शासकीय अधिकारी खडपोली ग्रामपंचायतीत चार वेळा येऊन गेले. वास्तविक पाहता याबाबत सरपंचांनी तत्काळ ग्रामसभा घेऊन याची कल्पना ग्रामस्थांना द्यायला हवी होती, जेणेकरून ग्रामस्थ, तक्रारदार व दुकानदार यांच्यामध्ये विचारविनिमय होऊन पुढील निर्णय घेता आला असता मात्र तस केलं गेलं नाही.

काही निवडूक लोकांनी केलेल्या तक्रारीमुळे गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीअंती सद्यस्थितीत उत्पनाचा दाखला घेऊन नवीन व दुय्यम रेशनकार्ड देण्यात यावेत, असे लेखी आदेश जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांनी चिपळूण तहसीलला दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कार्डधारकांना धान्यपासून वंचित राहावे लागते की काय? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे १४० ग्रामस्थांचा विनंती अर्ज निर्मल तंटामुक्ती राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या खडपोली गावातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेशन दुकानासंदर्भात आमची कोणतीही तक्रार नाही व रेशनदुकान गावातच राहावे, असा १४० ग्रामस्थांच्या सह्यांचा विनंती अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.