विद्यार्थी-पालकांना ऑफलाइन शाळाच हवी एस.आर. व्हिक्टरी स्कूलमध्ये शिक्षकांशी संवाद अशोक बालगुडे उंड्री, ता. 14 ः कोरोना महामारीमध्ये ऑनलाईन अभ्यासपेक्षा ऑफलाइन शिक्षण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस पोषक आहे, असा विद्यार्थी-पालकांचा सूर असल्याचे एस. आर. व्हिक्टरी स्कूलच्या शिक्षिका वैशाली पोटे यांनी 3-केएमशी बोलताना सांगितले. होळकरवाडी (ता. हवेली) येथील एस. आर. व्हिक्टरी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा प्रा. शोभा लगड, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. अनन्या गारडे (इ. दुसरी), आर्यन ननावरे (इयत्ता सहावी), नीशा ननावरे (इयत्ता तिसरी) या मुलांनी सांगितले की, ऑनलाइनमध्ये रेंज मिळत नव्हती, व्हीडिओ बरोबर दिसत नव्हता, कॅमेऱ्याची अडचण येत होती, अनेक वेळा आवाजामध्ये गोंधळ असायचा. मित्रांशी संवाद नाही, मोबाईल आणि घर या पलीकडे काही नव्हते. ऑफलाइनमध्ये फळ्यावर शिकविले जाते, शिक्षकांशी वेळीच संवाद होतो, मित्रांबरोबर अभ्यास आणि खेळ खेळताना मज्जा येते. बसमधून ये-जा करतान दंगामस्ती तसेच दुकानाच्या पाट्या वाचण्याचा आनंद मिळतो, त्यातूनही शिकता येते. दरम्यान, दिविजा इंजेवाड म्हणाल्या की, पालक आणि विद्यार्थ्यांकडून आता ऑफलाइन शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि बौद्धिक विकास होण्यासाठी आता शाळाच हवी आहे, असा सूर पालकांकडून आळवला जात असल्याचे त्यांनी सांगितले.