चिपळूण : तालुक्यातील खरवते येथील सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषीकन्या’ अनुजा रोहिदास भोसले, सपना पोते, किमया किरण शिंदे, कृष्णा कुडाळकर, प्रांजल लांजेकर, श्रुती जाधव यांनी असुर्डे गावातील विठ्ठल मंदिराच्या आवारात ग्रामस्थांसाठी माहिती केंद्राचे आयोजन केले होते.
या माहिती केंद्राचे उद्घाटन विठ्ठल मंदिराचे चेअरमन सुभाष गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. या माहिती केंद्रामध्ये विविध पिकांच्या माहितीचे पोस्टर्स लावण्यात आले होते. नैसर्गिक साधनांचा वापर करून असुर्डे गावाचा नकाशा तयार करून लावण्यात आला होता. यावेळी उपस्थित ग्रामस्थ, शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची, पिकांची माहिती देण्यात आली. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील या कृषिकन्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. महाविद्यालयही शेतीविषयक वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवत असते. यासाठी प्राचार्य सुमितकुमार पाटील आणि प्राध्यापक विद्यार्थ्यांना नवेनवे प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.