गुहागर : गांधी सप्ताहात एकही कारवाई न झालेल्या गुहागरच्या उत्पादन शुल्क विभागाकडून पुन्हा एकदा वसुली मोहिम सुरू झाल्याची चर्चा आहे. या मोहिमेत वसुलीसाठी नेमलेला 'तात्या' खाडीपट्ट्यात फिरुन दारुभट्ट्यांवर जाऊन हप्ते स्विकारत आहे. त्यामुळे उत्पादन शुल्कची कारवाई ही आता शुल्लक ठरल्याचे बोलले जात आहे. २ ऑक्टोबर गांधी जयंतीपासून सात दिवस गांधी सप्ताह साजरा केला जातो या दरम्यान, कुठेही बेकायदा दारूविक्री केली जात नाही. तसे आढळल्यास कारवाई केली जाते. या कालावधीत उत्पादन शुल्क विभागानेही कारवाईची मोहीम प्रबळ करायची असते. ठिकठिकाणी धाडीही टाकल्या जातात. दारूच्या हातभट्ट्या उद्धवस्त केल्या जातात. गुहागर तालुक्यातील खाडीपट्ट्यात दारूच्या हातभट्ट्या मोठ्या प्रमाणात आहे.
तात्पुरती कारवाई
गुहागर तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाया नेहमीच बोथट ठरलेल्या आहेत. तात्पुरती कारवाई झाली की, पुन्हा बेकायदा धंदे सुरू होतात. त्यांना उभारी कशी काय मिळते ? हाही संशोधनाचा विषय असतो. यामध्ये विशेष मुद्दा म्हणजे हप्ते वसुली होय. गुहागर उत्पादन शुल्क विभा तात्या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती वसुली मोहिमेत पुढे असते. तालुक्याच्या कानाकोपऱ्यात फिरुन वसुली करण्याचे काम तात्या इमानेइतबारे पार पाडताना दिसतो. अनेकजण त्याला तात्या म्हणून हाक मारतात.