रत्नागिरी : शहराच्या वैभवशाली ऐतिहासिक कारकिर्दीत भर टाकून त्याचे महत्व दाखवणारा रत्नदुर्ग किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. याच किल्ल्यावर भगवतीदेवीचे मंदिर आहे, मात्र येथे सूचना व मार्गदर्शक फलक नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. रत्नदुर्ग किल्ल्याचा दर्शनी भागही दुर्लक्षित राहिला आहे याची दखल घेणे आवश्यक आहे, अशी सूचना इतिहास अभ्यासक महेश कदम यांनी प्रशासनाला केली आहे.

कदम यांनी आतापर्यंत विविध ऐतिहासिक किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. तेथील ऐतिहासिक संदर्भही शोधून काढले आहेत. रत्नदुर्ग किल्ल्याचा विस्तार सुमारे १२० एकर क्षेत्रफळात असून बालेकिल्ल्यासह तीन किलोमीटर तटबंदी आणि ३५ बुरूज आहेत. यांसह इतरही अनेक ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. सध्या हाच मुख्य भाग मार्गदर्शक फलक नाहीत. मिकरवाडा बाजूकडील माचीवर बुरूज, तटबंदी, जंग्या, मंदिर परिसरात प्लास्टिक व दारूच्या बाटल्यांचा खच वाढला आहे. काही महिन्यांपूर्वी किल्ले संवर्धन करणार्‍या तरूणांनी रत्नदुर्ग येेथे स्वच्छता मोहीम राबवून काही पोती प्लास्टिक व काचेच्या बाटल्या जमा केल्या होत्या. तरी अजूनही हे अवैध प्रकार येथे चालतच आहेत. यासाठी रत्नदुर्ग किल्ल्यावर प्लास्टिक बंदी व्हावी, पर्यटकांना किल्ल्यावरील विविध ठिकाणे पाहण्याकरिता मार्गदर्शक फलक, इतिहास आणि किल्ला नकाशाही उभारण्यात आला पाहिजे.