रायगड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम करावयाचे आहे. आपण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून रायगड जिल्ह्यासाठी शासनाकडून सन 2022-23 करिता प्राप्त झालेला विकासनिधी संबंधित यंत्रणांनी विहीत कालावधीत खर्च करावा, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांनी आज येथे केले.

     जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे,आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर,आमदार रवींद्र पाटील, आमदार आदिती तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, रोहा उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे तसेच शासकीय विभागांचे विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

     या बैठकीत मागील बैठकीचे इतिवृत्त व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास समितीमार्फत मान्यता देण्यात आली. सन 2022-23 चा प्रारुप आराखडा व सन 2021-22 अंतर्गत दि. जानेवारी 2022 अखेरील खर्चाचा आढावा सादरीकरणाच्या माध्यमातून समितीसमोर मांडण्यात आला. लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांमार्फत प्रलंबित विषयांचा निपटारा होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेली अंमलबजावणी व अंतिम टप्प्यात असलेल्या विविध उपाययोजना त्वरीत पूर्णत्वास न्याव्यात, अशा सूचना पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे उदय सामंत यांनी दिल्या.

     पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या विविध विषयांवर जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

     जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देवू या, यासाठी सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांचे योगदान निश्चितच महत्वाचे राहणार आहे, असेही पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. 

     यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पालकमंत्री उदय सामंत व उपस्थित लोकप्रतिनिधींनी सूचित केलेल्या बाबींबाबत तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून तात्काळ आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

     जिल्हा नियोजन अधिकारी यांनी यावेळी उपस्थित समिती सदस्यांना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीबद्दल माहिती देताना सांगितले की, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 करिता रु.275.00 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून प्राप्त निधीपैकी रु.275.00 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी सप्टेंबर 2022 अखेर रु.181.61 कोटी इतका निधी खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी 66.00 टक्के इतकी आहे.