रत्नागिरी : रामायण मालिकेत श्री रामाची भूमिका व बुद्धाच्या जीवनावर आधारित 'सिध्दार्थ गौतम' या आंतरराष्ट्रीय चित्रपटांत तथागत बुद्धांची भुमिका साकारणारा अभिनेता गगन मलिक यांनी भारत बौद्धमय करण्याच्या अनुषंगाने देशात ८४ हजार बुद्ध मूर्तीचे वितरण करण्याचा संकल्प केला आहे. या अनुषंगाने रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे भव्य बुद्ध मूर्तीं वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
भारतामध्ये बुध्द धम्माचा अभ्यास करण्यासाठी अनेक चीनी अभ्यासक, विद्यार्थी आलेले आहेत. त्यामध्ये यू ह्यान संग, हित्सींग, फाहियान या सर्वांनी भारतामधील नांलदा, विक्रमशिला, तक्षशिला, विद्यापिठामधुन हा धम्म विदेशात पायी प्रवास करुन सातासमुद्रापलिकडे नेऊन बुध्दाचा विज्ञानवादाचा धम्म जगात पसरविण्याचे कार्य केले. हाच धागा पकडत गगण मल्लिक भारताच्या भूमीतून जाऊन तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भगवान बुध्द यांच्या योगदानाची चर्चा करून जगाला पटवुन देतात की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात लुप्त झालेला धम्म पुन्हा पुनर्जिवीत केला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा विचारांचा प्रसार-प्रचार जागतिक स्तरावर झाला पाहिजे, त्यासाठी अभिनेते गगन मलिक यांनी बौध्द धम्म स्वीकारून श्रामनेर दिक्षा सुध्दा घेतलेली आहे. व अशोका हे नाव धारण केले. यावेळी त्यांनी एक संकल्प केला की, सम्राट अशोकानी 84 हजार स्तुप, चैत्य, विहार शिलालेख धम्माचे प्रतिके उभारुन हा धम्म लिखित केला, आपण हे निर्माण करु शकत नाही परंतु भारताच्या भुमीत 84 हजार बुध्द मुर्तीचे वितरण करू शकतो. हाच संकल्प संपूर्ण भारतभर श्रमण अशोका तथा गगन मलिक हे राबवित आहेत. या पार्श्वभूमीवर गगन मलिक फौंडेशनच्या वतीने मौजे कपिलवास्तू नगर करबुडे येथे भव्य बुध्दमूर्ती वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संबोधी बुद्ध विहार याठिकाणी दिड फूट उंचीच्या बुद्ध मुर्त्या व बौद्ध विहारासाठी बुद्ध मूर्त्याचे वितरण होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी मौजे कपिलवास्तू नगर करबुडे बौध्दजन कमीटी स्थानिक आणि मुंबई तसेच आदर्श महिला मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील जनतेला थायलंड देशातील पंचधातू आणि अष्टधातू बुद्धमूर्ती संदर्भात आवाहन करण्यात आले होते. संबंध महाराष्ट्रातून आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून वैयक्तिक स्वरूपात १२५ बुद्ध मुर्त्यांची नोंदणी झाली आहे. तर सहा बुद्ध विहारासाठी मूर्तीची नोंदणी करण्यात आलेली आहे. सदर बुद्ध मूर्तीं वितरण सोहळा दिनांक ३० ओक्टोबर २०२२ रोजी करबुडेतील संबोधी बुद्ध विहार येथे करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी स्वतः श्रमण अशोका तथा गगन मलिक त्यांच्यासमवेत थायलंड देशातून बौध्द भिख्खू संघ, तसेच प्रतिष्ठित मान्यवर उपासक-उपासिका उपस्थित राहणार आहेत.
या संपूर्ण भव्य दिव्य बुध्द मूर्ती वितरण सोहळ्याचे आयोजक मौजे कपिलवास्तू नगर करबुडे बौध्दजन कमीटी स्थानिक आणि मुंबई तसेच बौध्दजन पंचायत समिती शाखा ३८ आणि आदर्श महिला मंडळ यांनी केले आहे. मूर्तींची नोंदणी करण्यापासून ते मुर्त्या घेऊन येण्यापर्यंत सर्व जबाबदारी संघटनेचे सदस्य अनिल जाधव, अंकुश जाधव, हेमंत जाधव, सेक्रेटरी सुरेश श्रिपत जाधव तसेच या मंगलमय धम्म कार्यास वैयक्तिक सहयोग करणारे मौजे दांडे आडोम बौध्द संघटनेचे सेक्रेटरी महेश सावंत , यासोबत सत्यशोधक सामाजिक संस्थेचे सेक्रेटरी शैलेश अशोक जाधव या सर्वानी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून मोलाचे असे सहकार्य केले आहे.
तसेच नवंगांव बौध्द दिक्षा भूमी विकास समितीच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या दिक्षा भूमी क्रांती अशोक स्तंभाच्या निर्मितीमध्ये मौजे कपिलवास्तू नगर करबुडे या संघटनेची महत्वपूर्ण भूमिका राहिली असून धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी ही संघटना व संघटनेचे सदस्य नेहमीच कार्यरत असल्याचे कृतीतून दिसून येते आहे. धम्म चळवळीतील सकारात्मक दृष्टीकोनातून या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर उपासक उपासिका उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात येईल, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे.