चिपळूण : कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन-संवादासाठी प्रसिद्ध असलेले नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर यांचे शहरातील ‘अपरान्त’ हॉस्पिटलमध्ये काल (मंगळवार दि. ११) रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी हृदयविकाराने दु:खद निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. एकविसाव्या शतकात, कोकणला आठ हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास असल्याचे पुरावे उपलब्ध झाले असताना काही दशकांपूर्वी, ‘कोकणला प्राचीन इतिहास नाही’ हे शासकीय तज्ज्ञांचे म्हणणे नऊ ताम्रपटांचा शोध घेत अण्णांनी आपल्या मेहनतीने खोडून काढले होते. कोकणात ‘अपरान्त’ हा शब्द रूढ करण्यात त्यांचे मौलिक योगदान राहिले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे जगप्रसिद्ध दाभोळमधील आपल्या ६० वर्षांच्या वास्तव्याला पूर्णविराम देत नोव्हेंबर २०१८ पासून ते चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे आपल्या कन्येकडे वास्तव्यास होते. आठवडाभरपूर्वी पासून ते चिपळूण गुहागर रोड वरील मालघर येथे मुक्कामी होते. १९६०मध्ये दाभोळला वास्तव्यास आल्यावर अण्णांच्या संशोधन आणि संग्राहक वृत्तीला खतपाणी मिळाले होते. दाभोळच्या खाडीला येऊन मिळालेल्या वाशिष्ठीच्या दोन्ही तीरांवरील सांस्कृतिक, सार्वजनिक आयुष्यात अण्णा आयुष्यभर वावरले. गेली ७५हून अधिक वर्षे ते डायरी लेखन करीत राहिले. बेताची आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी आयुष्यात असंख्य छंद जोपासले. अपरान्ताच्या साधनांसाठी ५०हून अधिक वर्षे डहाणूपासून कारवारपर्यंत धावपळ केली. दुर्मीळ वस्तूंचा संग्रह केला. वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन, वागण्यातील वक्तशीरपणा हे त्यांच्या कार्यपद्धतीतील आवर्जून दखल घेण्याजोगे गुण होते. कोकणचा स्वाभिमान जागवत, इतिहासाला कलाटणी देण्याचे काम त्यांनी केले होते. सतत धडपडणाऱ्या माणसाचे आयुष्य जगत शिक्षणाचा अगर वडिलोपार्जित कर्तृत्वाचा वारसा नसताना आपल्या अभ्यासू वृत्तीने ते कोकण इतिहास संशोधनाच्या माध्यमातून जगभर पोहोचले होते. अण्णांनी १४ पुस्तकांचे लेखन केले. ५ सप्टेंबर १९३० रोजी गुहागर तालुक्यातील विसापूर येथे जन्मलेल्या अण्णांचे रितसर शालेय शिक्षण फार झाले नव्हते. त्यांच्या जीवनावर आई चंद्रभागा हिचा प्रभाव होता. आईमुळे समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन विशाल आणि उदार झाला होता.
पत्नी कै. सौ. नंदिनीकाकींच्या पश्चात २०१२ नंतर वयोमानानुसार थकलेले अण्णा उपलब्ध वेळेत समाजाला ‘अधिकचे काही देता येईल का?’ याच्याच विचारात असायचे. अण्णांनी आपल्या आयुष्यात शिक्षण, सहकार, कामगार, ग्रामीण विकास, वाचन संस्कृती, अपंग संस्था, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र आणि कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध या विषयात मैलाचा दगड ठरणारे कार्य उभे करून ठेवले. राजकारणासारख्या विषयात माणूस एकदा अडकला की प्रसिद्धीचे वलय, कार्यकर्त्यांचा गोतावळा या साऱ्यातून दूर जाणे अवघड असते. अण्णांनी वयाच्या पन्नाशीनंतर जाणीवपूर्वक राजकारणातून समाजकारणात स्वतःला वाहून घेतले होते. आपल्या कामाला योग्य दिशा मिळावी म्हणून सन१९८३ मध्ये त्यांनी ‘सागरपुत्र विद्या विकास संस्था’ स्थापन केली होती. सारा अपरान्त पायी तुडवून इतिहासाची अनेक साधने गोळा केली होती. ताम्रपट, लहान-मोठ्या तोफा, जुनी कागदपत्रे, पोथ्या, शिलालेख, तलवारी, बंदुका, खंजीर, जुनी नाणी, अनेक लहान-मोठ्या मूर्ती, सनदा, जुनी नक्षीदार भांडी आदि वस्तूंचा या साधनांमध्ये समावेश होता. त्या काळी दाभोळसारख्या फारशा सोयीसुविधा नसलेल्या गावातून एखाद्या छंदामागे बेभान धावत आपले कार्य सिद्धीस नेणे ही मोठी गोष्ट होती. 'इतिहास हा कधीच कल्पित नसतो. तो कागदपत्रांवर आणि पुराव्यांवर आधारित असतो, हे अण्णांनी खूप अगोदरच निश्चित केले होते' हे त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात यायचे. अगदी सुरुवातीला ‘आपल्याला नक्की काय हवंय?’ याचं मर्म उमजल्याने आयुष्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून टाकीत जगाने ठरवून दिलेल्या चाकोरीबद्ध मार्गावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा स्वतःला आनंद देणाऱ्या निरुपद्रवी छंदांसोबत अण्णा आपले आयुष्य जगले.
याही वयात अण्णांचे वाचन, लेखन, चिंतन सुरू होते. त्यांच्या पत्नी स्व. सौ. नंदिनी यांच्या दहाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने एक विशेषांक प्रकाशित करण्याच्या ते प्रयत्नात होते. 'हा शेवटचा विशेषांक आहे' असेही त्यांनी या विशेषांकांतील आपल्या निवेदनात म्हटले होते. अण्णांच्या मनात जीवनभर केलेल्या चिंतानाच्या आधारे शिवकाळ आणि पेशवाई या दोन विषयांवर स्वतंत्र दोन पुस्तके लिहिण्याचे विचार सुरू होते. त्यासाठीच्या संदर्भांची जुळवाजुळव सध्या ते करीत होते. त्यांच्या पश्चात सून, मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.