रत्नागिरी : देवरुख एसटी बसने जाणाऱ्या एका मद्य धुंद तरुणाने एसटी वाहकालाच मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर एसटी बस वाहकाने थेट एसटी पोलीस ठाण्यातच नेऊन लावली आणि पोलिसांनी याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, रत्नागिरी आगारातून एस. टी. बस देवरूखच्या दिशेने निघाली. या बसमध्ये जयवंत जगन्नाथ मोहिते (४०, देवरूख आगार) हे वाहक होते. ते बस मधील प्रवाशी घेऊन देवरूखला जात होते. बस जयस्तंभ येथे आली असता दारूच्या नशेत असलेला तरुण गाडीत चढला. यावेळी तो तरुण आणि वाहक यांच्यात तिकिटावरून बाचाबाची झाली. याचा राग आल्याने त्या मद्य धुंद तरुणाने वाहक जयवंत याना बेदम मारहाण केली. वाहकाला मारहाण होतेय हे पाहताच बस चालकाने जयस्तंभ येथून थेट एस. टी बस शहर पोलिस स्थानकात नेली. सर्व प्रवाशांची वरात ही गेली पोलिस स्टेशनला. त्यानंतर वाहकाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर एस. टी. बस पुन्हा रहाटाघर बस स्थानकात गेली. व पुढे मार्गस्थ झाली. असे असले तरी यामुळे इतर प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागला.