तीन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये धो-धो पाऊस पडत आहे. या पावसामुळे हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. कापूस, सोयाबीन, बाजरी यासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री पडलेल्या पावसात सहा मंडलात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. यंदा सरसरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.

यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडत गेला. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने थोडीफार उघडीप दिली होती. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पाऊस धुव्वाधार पडत गेला. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. या अतिरिक्त पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापसाची सर्वाधिक लागवड झालेली आहे. या पावसाने कापसाच्या वाती तर सोयाबीनची माती झाली. भाजीपाल्यांचेही आतोनात नुकसान झाले. या पावसाने जिल्हाभरातील जवळपास सर्व धरणं ८० ते ८५ टक्के भरले आहेत. रात्री पडलेल्या पावसात सहा ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. गेवराई मंडलात ६६.०, मादळमोही मंडलात ६६.०, किट्टीआडगाव मंडलात ६६.०८, धर्मापुरी मंडलात ६६.८, मांजरसुंबा मंडलात ७१.८ व नेकनूर मंडलामध्णये ७१.८ व इतर मंडलात ४३.८, नाळवंडीत ४८.८, पाली मंडलात ३३.५, नेकनूर ७१.८, म्हाळसजवळ्यात ३४.००, पिंपळनेरमध्ये २४.८, चौसाळ्यात ३२.०० इतका पाऊस पडला. या पावसाने सरासरी ओलांडली असून ५९४.३ इतका पाऊस पडायला हवा, त्यापेक्षा आता ७०९.६ इतका पाऊस पडला.