बीड (प्रतिनिधी) - शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन च्या सभागृहाला अवकळा आली असून सभागृहातील अनेक खुर्च्या तुटल्या असून भिंतींवरील पंखे गायब झाल्याने येथे घेण्यात येत असलेल्या कार्यक्रमांवर विरजण पडत आहे. अशी तक्रार मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली असून येथील दुरावस्था दूर करण्याची मागणी करत संबंधित अधिकारी फक्त सभागृहाचे भाडे घेण्याकरिताच आहेत की काय ? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, शहरातील अहेमदनगर रोडवर शासकीय विश्रामगृहासमोर काही वर्षांपूर्वी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक न्याय भवन या इमारतीची निर्मिती करण्यात आली. याच न्यायभवनमध्ये २०० आसन व्यवस्था असलेले सभागृह बांधण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत या सभागृहात अनेक कार्यक्रम झालेत व होत आहेत. मात्र सुरुवातीला दृष्ट लागण्यासारखे असलेल्या या सभागृहाला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या काही वर्षांपासून अवकळा आलेली आहे. ही अवकळा दूर करून सभागृह पुन्हा पहिल्यासारखे देखणे व सोयीसुविधांनी युक्त करण्याची तसदी येथील जबाबदार अधिकारी व कर्मचारी घेत नाहीत. या सभागृहातील २०० खुर्च्यांपैकी अनेक खुर्च्या तुटल्या आहेत. व्यासपीठावर फक्त दोन सिलिंग फॅन चालू आहेत. संपूर्ण सभागृहातील भिंतींवर फक्त एकच पंखा आहे तोही बंद पडलेला आहे. एवढ्या मोठ्या सभागृहातील सगळ्या
भिंतींवर लावलेले बाकीचे डझनावारी पंखे गेले कुठे ?सभागृहाची जबाबदारी असलेले अधिकारी फक्त भाडे घेण्यासाठीच नेमलेले आहेत की काय ?कार्यक्रमासाठी सोयीसुविधा पुरविणार कोण ? येथे २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असताना ही अनेक खुर्च्या तुटतातच कशा ? भिंतींवरील पंखे गायब होतातच कसे ?तुटलेल्या खुर्च्या दुरुस्त करणार कोण ? गायब झालेले पंखे भिंतीवर पुन्हा लावणार कोण ? कार्यक्रम असो वा नसो दरवाजे सताड उघडे कशासाठी ठेवले जातात ? असे एक ना अनेक प्रश्न या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मधील सभागृहाची अवस्था पाहून उपस्थित होत आहेत. या प्रश्नांकडे लक्ष देऊन जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील सभागृहाची दयनीय अवस्था सुधारून सभागृह नीटनेटके करावे अशी मागणी मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली असून या सभागृहाची झालेली दुरावस्था दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे नमूद केले आहे.